शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

 तेथे कर माझे जुळती ......

काल दि. 14/02/2020 ला सावखेडा बु. ता. सिल्लोड येथे झालेल्या ४ थ्या भूमिजन साहित्य संमेलनात शम्स जालनवी साहेब या 97 वर्षाच्या गझलकारांना जवळून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला. त्यांनी 'मेरा मुल्क कितना पागल है' या गझलेचे गायन केले. ते ऐकून माझ्यासारखेच सर्वजण तृप्त झाले असतील. गझल इतक्या तन्मयतेने आणि गोड गळ्याने गायली की, जे त्यांना पहिल्यांदाच ऐकत होते ते सर्वच अवाक् झाले. आवाजात कुठे कंप नाही की, एखादया ओळीचे विस्मरण नाही. चूक नाही की कुठे, अडखळले नाही!
त्यानंतर सुनिलदादा उबाळे यांनी माझी आणि साईनाथ फुसे सरांची त्यांच्याशी ओळख करून दिली. शम्स साहेबांबद्दल ऐकून होतो. सिल्लोड मधील युवा आणि उमदे कवी पवनराजे आणि नव्या पिढीचे गझलकार परवेज (जयविरू)या जोडगोळीकडून मी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्षात भेटलो.
शम्स साहेबांबद्दल काय बोलावं!
तरूणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व...
या वयातही पुर्णवेळ संमेलनात बसून होते. बरं बडेजावं, मोठेपणं किंवा स्टेट्सला जपणं वगैरे त्यांच्या खीजगिणतीतही नाही.
संमेलनात त्यांच्याबाबतीत अनेक किस्से ऐकायला मिळाले. मागे मा. पंतप्रधानांनी दिल्लीला लाल किल्ल्यात मुशायऱ्याचे आयोजन केले होते, शम्स साहेबांना त्याचे निमंत्रण होते. ऐवढा मोठा माणूस पण एका खेड्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात अतिशय सामान्यपणे वावरत होता. काही वेळेला त्यांना आधार द्यायला डॉ. राज रणधीर होतेच.
संमेलनाची सांगता झाल्यानंतर मुद्दामच त्यांना सिल्लोडला चहा घेण्यासाठी आग्रह करून थांबवले होते.
डॉ. गोवर्धन मुळक सर, डॉ. राज रणधीर, प्रकाशदादा खरात, धनंजय गव्हाले सर, श्री. शेजूळ सर, श्री. खेडकर सर, श्री. कायटे सर आणखी काही कवीवर्यांनी चहा घेतल्यानंतर मी मुद्दामच त्यांचा हात धरून त्यांना डॉ. राज रणधीर सरांच्या गाडीत बसवले आणि विचारले , "आता काय, आराम वगैरे चालू असेल ना?" इतरांच्या चर्चेतून ते काय करतात हे मला माहित झाले होते पण गाडीमधे कायटे सरांनी सांगीतले की, ते आता फक्त पेपरच्या दुकानवर बसतात त्यामुळे मी मुद्दामच हा प्रश्न केला. त्यावर, "अरे नही यार, आराम कैसे करेंगे? जबतक होता है तब तक काम करेंगे." त्यावर माझा प्रश्न, आप क्या काम करते है इस उम्र मे?" त्यावर साहेब स्मितहास्य करत म्हणाले,"अरे भाई, मै आज भी सुबह सयकल पर पेपर बाँटता हू!!!!!"
झालात ना आवाक!
साहेब आताही वयाच्या 97 व्या वर्षी सायकलवर पेपर वाटतात.
अशा व्यक्ती पाहिल्या की, जीवनात एक नवी उमेद निर्माण होते. जीवनाकडे सकारात्मकरीत्या पाहण्याचा कल वाढतो.
या संमेलनात साहित्यातल्या अनेक दिग्गज व्यक्त्तिंना जवळून पाहता आणि अनुभवता आले.
खरे तर यासाठी या साहित्य संमेलाचे कार्यवाहक व जि. प. प्रा. शा. सावखेडा बु. चे मुख्याध्यापक श्री. सुनिल डोके सरांना व त्यांच्या शिक्षक सहकात्यांना शतशः धन्यवाद द्यायला पाहिजेत. अतिशय सुंदर असे नियोजन सरांनी केलेले होते त्याचबरोबर सावखेडा बु. चे श्री.काशीनाथ गोरे पाटील(साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष) व सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केले ते कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे होते.
खरचं हे साहित्यसंमेलन एक समृद्ध असा अनुभव देऊन गेले.

 आज आमच्या मिथुनचा वाढदिवस...

आमचा मिथुन म्हणजे माझा मित्र भारत..
सिनेमाची गाणे रेड़ीओवर ऐकायला मिळायची आणि हिरोंची नावे कळायला लागली तेव्हापासून 'आबिताब' आणि मिथुन या दोन हिरोंचा पगडा मनावर होता पण त्या काळात डिस्को डान्स करणारा हिरो म्हणून मिथुनदाच जवळचा वाटायचा.
त्याची स्टाईल, डान्स, डायलॉगची नक्कल करावीशी वाटायची. त्यामुळे आमच्या गँगमधे बरेचजण मिथुन होते. पण सर्वात मोठा फॅन आणि जवळजवळ मिथुनच होता भारत...
मिथुनचा एखादा पिक्चर (व्हिडीओवर १ रु. तिकिट) पाहून आला की तो पुर्णपणे मिथुनमय होऊन जायचा. त्यामुळेच तो कुठलाही डान्सक्लास न लावताही (त्यावेळेला डान्सक्लास होते की नाही हे सुध्दा माहीत नाही.) मिथुनच्या डान्सस्टाईलची हुबेहूब नक्कल करायचा आणि तो आमचा डान्सर मिथून झाला. त्याकाळी फुंकर मारली तर उडून जाईल असा असणारा बेचाळीस किलोचा भारत आज एका बुक्कीत कोणालाही खाली लोळवेल असा ब्यान्नव किलोचा झालेला आहे पण डान्समधे अजुनही काहीही फरक पडलेला नाही. चार मुलींचा बाप असलेल्या या मिथुनमधली डान्ससाठी असणारी लवचिकता आणि अॅक्टिंगचा किडा तसूभरही कमी झालेला नाही.
डान्सच्या आवडीपायी नंतर तो गोविंदाची स्टाईलही हुबेहूब करायचा. त्याकाळी तो सुंदर नाचायचा की, वरातीत त्याचा डान्स पाहून लोकही खूश होऊन जायची. त्याला जोड असायची विष्णुची.(हा आमचा गोविंदा).नंतर मात्र शाहरुखची इंट्री झाली आणि आमचा मिथुन अचानक शाहरूख झाला. हेअरस्टाईलही बदलली. दहावी बारावीचे ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो शाहरुखच्या हेअरस्टाईलमधे काढल्यावर एका साईडने आपण शहारूखसारखेच दिसतो याचा साक्षात्कारही त्याला झाला. नंतर तो शाहरुखचा ऐवढा चाहता झाला की, दिवाना या सिनेमातले गाणे, 'कोई ना कोई चाहिए .... प्यार करनेवाला...... हे गाणे केवळ आपल्यासाठीच बनवण्यात आले आहे असा त्याचा पक्का समज झाला आणि बाजीगर पाहिल्यावर 'आत्ताच्या परिस्थितीत शाहरुखसारखा अॅक्टरच नाही कुणी ' असे तो बिनधास्त बोलायला लागला. नंतर शाहरूखमय झालेला भारत 'डर' पाहिल्यावर चाकुने आपल्या छातीवर एखादया मुलीचे नाव कोरतो की काय अशी भिती आम्हाला वाटायला लागली होती. हे आमच्या भागातील मुलीनांही माहित असल्यामुळे त्याच्या छातीवरील रक्त वाया जाऊ नये म्हणून पुरेपूर दक्षता मुलींनी घेतल्यामुळे त्याला असे काही करायला मिळाले नाही.
वर्णाने काळा असलेला हा मित्र विचाराने खूपच सकारात्मक, विनोदी आणि कोणत्याही परिस्थितीत खूश राहणारा आहे. घराच्या मातीच्या भिंतीत लावलेल्या आरशाच्या फुटक्या काचेत बघत आणि केस शाहरुखसारखे लावत, ' भारत्या... क्या दिखता है बॉस तू' असं स्वतःच स्वतःला म्हणत खूश होणारा माझा हा मित्र कमालीचा स्वाभिमानी आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात मी त्याला कधीही कुणाला पैसे उसने मागतांना पाहिले नाही. आहे त्या परिस्थितीत खूश कसे रहायचे हे त्याला पक्के ठाऊक आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत त्याचे कुणाशी भांडण झालेलेही मला आठवत नाही.
सामाजिक, धार्मिक कार्यात आमच्या गँगचा पूर्णपणे पुढाकार असायचा त्यावेळी कोणतेही काम करतांना त्याने कधी 'नाही' म्हटलेले आठवतं नाही. (पण 'हो' म्हणून ५०% काम केलेलेही मला आठवत नाहीत.)
होळीनंतर धुळवडीच्या आदल्या रात्री मी 'होळी है बुरा मत मानो' म्हणून सर्व मित्रपरिवाराच्या टिंगलटवाळी करण्यासाठी काहीतरी लिहून कागद बौद्धविहाराजवळ चिकटवून ठेवायचो. कुणाच्या रंगाबद्दल काही बोलू-लिहू नये पण भारत रागावला तरी चालेल पण त्याची टिंगल उडवायचीच या हेतुने मी लिहलं होतं, "मित्रा तुझ्या रंगाच भलतच वाटतं वाईट, तुझे कलर फोटोही निघतात ब्लॅक अँन्ड व्हाईट" ते वाचून सर्व गँग हसायला लागली. ते पाहूनच मला, भारतचे आणि माझे भांडण कसे रंगणार ते लक्षात आले. पण झाले उलटेच. स्वतः भारतच एवढा हसला की, माझा ताण कमी झाला. विनोदाची जाण असलेल्या या मित्राने मलाच दाद दिली.
मी लिहिलेल्या एकांकी नाटकात फार सुंदर काम त्याने केले. गावातील लोकांच्या अजुनही ते आठवणीत आहे. दुसऱ्या एका नाटकात अंगात येणाऱ्या बाईचे सोंग त्याने एवढे बेमालुम वठविले होते कि, माहिलांसोबत असणारी लहान मुले घाबरून रडायला लागली होती....
मित्रा तुझ्याबाबतीत खूप आठवणी आहेत त्या कधीतरी सांगेनच...
टिकटॉकवर डान्स आणि अॅक्टिंगचे व्हिडीयो पाहून कुणाच्याही लक्षात येईलच आमचा मिथुनचा शाहरुख झालेला भारत कसा असेल!
तुर्तास एवढेच.....
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा मित्रा...
- आर. के. आठवले
9011895917

 माझे मित्र चित्रकार, कवी, बासरीवादक, गायक अष्टपैलु व्यक्तिमत्व श्री. साईनाथ फुसे सर यांनी काल माझ्या वाढदिवसानिमित्य माझ्या गझलेचे रसग्रहण करून व नाट्यकलाकार, लेखक, दिग्दर्शक, कवी श्री. राजेंद्र सपकाळ सर तसेच संगीतकार कवी श्री. अमोल कुळकर्णी सरांसह घरी येऊन माझ्या गझलेचे पियानोवर गायन करून मला अनोख्या पध्दतिने शुभेच्छा दिल्या.

ज्या मनाच्या कप्प्यात कायम राहणार आहेत.
सरांनी केलेले रसग्रहण नक्की..... वाचा मित्रहो.....
कदाचित 1 व्‍यक्ती, केस, उभा आहे आणि आउटवेअर ची प्रतिमा असू शकते

Sainath Phuse
 
Dnyaneshwar Kulkarni
 आणि इतर ७ जणांसह आहेत.

आज माझा प्रिय मित्र राजू आठवले याचा जन्मदिन.....यानिमित्ताने एक चांदण्यांची शब्दमाळ या अवलिया,हरहुन्नरी, बहुआयामी, बहुगुणी,बहुविध व्यक्तिमत्वासाठी.....
"गझल आणि रसग्रहण....."
शब्दांना भावनांची किनार मिळाली की माणूस आपल्या मोरपंखी लेखणीने वेदनांना कुरवाळायला लागतो,ओघळणाऱ्या आसवांना कुसुम सुगंधी शब्दांचा बांध घालतो आणि बघता बघता जखमा सुगंधी व्हायला लागतात.दुःखाचे गहिरे कवडसे हृदयाच्या तिमिरमौनात कोवळ्या हळदिव्या उन्हासारखे प्रकाशु लागतात.हृदयात काजळलेल्या आठवणी शिशिर उन्हासारख्या झळाळू लागतात.शंब्दांची जेव्हा गझल होते तेव्हा जगण्यालाही एक छानशी लय प्राप्त होते.आयुष्याला वेदनांचे पैंजण बांधून गझलेच्या पेरा पेरात शब्द अंकुरून येतात आणि जीवनाला शब्दसुगंधी धुमारे फुटतात.गझल हा हळव्या मनावर शहारलेला वणवा आहे.गझल आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारा शब्दझुला आहे.गझलेत असंख्य डोळ्यात पाहिलेली,वाचलेली,अनुभवलेली दुखाश्रूंची गंधवेदना पेरली की गझलफुलांवर संधिकाळी जीर्ण आठवणीत गुंतलेली फुलपाखरे रेंगाळू लागतात.अव्यक्त भावनांना गझल सप्रवाही करते.निरंतर गोठलेल्या उरीच्या वेदना नितळ झऱ्यासारख्या वाहू लागतात.म्हणून तर हा गझलकार एके ठिकाणी लिहितो,
"हृदयात आठवांचा, पाऊस दाटलेला
झरतो कधी उरातून,पाऊस गोठलेला"
किंवा
"ओठ माझे ऐन वेळी,का असे हे गोठलेले?
ती उभी माझ्या पुढे पण,बोलताही येत नाही"
या अव्यक्त भावना गझल नसती तर या गझलकाराने कोणत्या उंबरठ्यावर ही दुखरी ओंजळ रिक्त केली असती,कोणत्या क्षितिजाजवळ कोणत्या उदास प्रहरी उदासलेली काजळी पुसली असती?प्रश्नच आहे.....
माणसाच्या आयुष्यात हरलेल्या युद्धांना, निसटलेल्या यशाला,अपयशी पायऱ्यांना खूप महत्त्व आहे.हे कदाचित या गझलकाराने जवळून अनुभवले असावे.म्हणून तर तो लिहितो,
"मी सोसले उन्हाळे,जीवनास पेलताना
जेव्हा पिडेत तू पण ,दिसलास हासतांना
चढताच पायऱ्या या ,पडतो कितीक वेळा
मोजू नकोस अपयश,शिखरास गाठताना"
"राधा" वृत्तात लिहिलेली एक गझल तर आश्रमाच्या पायऱ्या ओल्या करेल इतकी सजल आहे.जवळचेच चेहरे जेव्हा सरड्याने रंग बदलावा तसे रूप बदलून भेटतात तेव्हा कळते की माणसं वाचण्यात किती चुकले आहे.स्मृतिविच्छेद करून ही भेगाळल्या काळजाची माणसं विद्रुप मुखवट्यांना आपल्या प्रणापलीकडे जपतात.आरशातही हा विद्रुप चेहरा त्यांना दिसत नाही.गर्भात 9 महिने सांभाळलेली लेकरचं जेव्हा आश्रमाच्या आश्रयाला नेवून सोडतात तेव्हा आश्रमाच्या पायऱ्याही एकांतात ढसा ढसा रडत असतील.....तेव्हा हा गझलकार लिहितो,
"आश्रमाच्या आश्रयाला आणले आहे !
लेकरांनी पांग माझे फेडले आहे !
मुखवट्या मागील कळतो चेहरा आता
तेवढे मी माणसांना वाचले आहे....."
सरणावर असतांना माणसाच्या काय भावना असतील ही कल्पनाही ऊर्ध्वगामी आहे.प्राण अधांतरी असतांना निष्प्राण देहाच्या विरक्त ,उद्विग्न लहरी जीवनाला सोसल्याची गतप्राण भावना प्रकट करते हे या गझलकाराने किती सुंदर लिहिले आहे.....
"जीवना , मी तुला सोसले केवढे !
शांत , सरणावरी वाटले केवढे !
मन तुला अर्पिले,तन कुणाला दिले !
फूल शय्येवर , टोचले केवढे !
ही अवस्था तर खूपच विरहव्याकुळ आहे.कित्येकांच्या आयुष्यात हे घडते की आपण मन एका व्यक्तीला अर्पतो आणि देह दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन करतो.मग अशा विरहप्रचुर,प्राणविमुक्त अवस्थेत शय्येवरील फुले टोचणार नाही तर काय होईल? पण तरीही आपण फुलशय्येवर निरर्थक, अनारस दरवळण्याचा प्रयत्न करत असतो.टोचलेल्या फुलांची दाहकता स्मृती शय्येवर विसरून जातो.
एका ठिकाणी तर हा गझलकार कल्पनेच्या पलीकडचे लिहितो आहे जिथे माथा टेकवावा असे आहे.माणूस जेव्हा आधारवड म्हणून जगत असतो तेव्हा त्याची घुसमट,शब्ददोलायमान अवस्था ही बुंध्यासारखी होते.वृक्षाचा बुंधा त्याच्या फांद्यांना किती आनंदाने तोलून धरत असतो.या फांद्या त्याच्याच आधारावर भिंगर वाऱ्यात डोलत असतात,जीवनाचा आनंद घेतात पण इथे त्या बुंध्याची भार पेलताना झालेली जडभार अवस्था त्या फांद्यांच्या लक्षात येत नाही.तो बुंधा भाराने एवढा घट्ट रुतलेला असतो की डोलताही येत नाही.घरात असाच वटवृक्ष प्रत्येक ठिकाणी असतो जो सर्वांचा विचार करता करता आनंद घेणेच विसरून गेलेला असतो.त्याला फक्त भार पेलणे माहीत असते.तेव्हा हा गझलकार लिहितो,
"तोलतो बुंधा किती,फांद्यास मोठ्या तृप्ततेने
भार सारा पेलताना,डोलताही येत नाही.....
पिंजरा हा बंगल्याचा,सोडताही येत नाही !
कोंडमारा एवढा की,सांगताही येत नाही !
कधी कधी माणसाकडून काही अकल्पित, अनाठायी चुका होतात तेव्हा आपल्या स्वतःच्या अशा वागण्यावर विश्वासही बसत नाही.एखाद्या निरपराध,निष्पाप,निरागस जीवाचे आपण निर्हेतुक प्राणांतिक लचके तोडलेले असतात.नंतर कधीतरी आठवल्यावर आपण असे कसे वागू शकलो याचे उत्तर कोणत्याच आभाळात मिळत नाही.स्वतः च्या डोक्यावरचा आभाळाचा तुकडाही आपला राहत नाही.स्वतः च्या प्राणाचा कडेलोट करावा की काय असे होऊन जाते,चूक मान्य करण्यालाही अर्थ उरत नाही.....या गझलकाराने निरातीशय प्राणभेदक ओळी लिहिल्या आहे.वाचून अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही.आयुष्यातले अनेक असे प्रसंग,घटना मग आपल्याच मनाचे लचके तोडू लागतात.....हा गझलकार लिहितो,
"मेंढ्यागत मी कसा वागलो झुंडीसंगे ?
तुझे तोडले मीही लचके,चुकले माझे....."
या गझलकाराकडे कमालीची प्रतिभा आहे.गझलेच्या एका एका शेरात अनेक अर्थ,पैलू आहेत.स्वतः च्या चुकांवरही कुठेही पांघरूण घातल्याचे दिसत नाही.मनाचा तळ नितळ,निर्मळ पारदर्शक आहे,हृदयाचे चक्षु समजदार आणि अपार निरीक्षणक्षम आहेत,लेखणी शब्दांच्या असंख्य वणव्यानी तळपती आहे,शब्दांची अलवार फुंकर जखमांना मोरपंखासम कुरवाळणारी आहे.
अशा या प्रतिभावंत गझलकार ,कवी ,नाटककारास काव्यमयी जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो.....
"हा नाटककार ।गझलकार हा
शोभे कवी पहा । अभिनेता
गुणांची महती । काय ही तुझिया
तूचि सारंगिया । साहित्याचा
शब्द तुझे श्वास । कविता सुगंधी
तू परागगंधी । अवलिया"
- साईनाथ फुसे
राजू आठवले ज्यांचा हरेक श्वास गझल आहे अशा प्रतिभासंपन्न गझलकारास यशाची उत्तुंग शिखरे प्राप्त होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.तुझ्यासाठी या काही ओळी स्नेहभेट करत आहे मित्रा.....
"ध्यास गझल,
श्वास
गझल,
उच्छवास गझल.....
आठवले
मित्रा,
तुझ्या
हृदयाची आस गझल.....
हे
कुरवाळती
शब्द तुझे
सुगंधी अशा जखमांना
वेड्या मनाचा
विहार
विहंगम,
विश्वास गझल....."
-साईनाथ फुसे
18.09.2020

 कालचा वाढदिवस आठवणींच्या कप्प्यात कायम घर करून राहणारा आहे.

चित्रकार, कवी, बासरीवादक श्री. साईनाथ फुसे सरांनी माझ्याबद्दल व माझ्या गझलेबद्दल जे रसग्रहण केले त्यामुळे माझी गझललेखनाची जबाबदारी वाढली आहे. एखाद्या कविला किंवा गझलकाराला आपल्या काव्यातून जे सांगायचे असते किंवा ज्या भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा त्या त्यातील गर्भित अर्थासह जेव्हा वाचकापर्यंत/रसिकांपर्यंत पोहचते तेव्हा त्याला निश्चितच आनंद होतो.
परंतु खरे सांगायचे तर काल मला सरांनी लिहलेले रसग्रहण वाचून माझीच गझल मला नव्याने भेटल्यासारखी वाटली. खरे तर मी आत्ता कुठे गझलेच्या सागरात नुकतेच पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण सरांनी केलेल्या रसग्रहणामुळे मी 'बरे' लिहू शकतो एवढा आत्मविश्वास नक्कीच मिळाला आहे.
सरांनी 'जीवना मी तुला, सोसले केवढे' ही माझी गझल माझ्या घरी पियानोवर अतिशय सुंदर चाल लावून गायन केली तो क्षण मी कधीच विसरणे शक्य नाही. मागील एक वर्षापासून सरांनी चित्रकलेचा क्लास सुरू करावा म्हणुन आम्ही सरांच्या मागे लागलों होतो पण सरांना वेळ मिळत नसल्याने ते शक्य होत नव्हते पण काल घरी आले असता सर सहजच बोलून गेले की, आठवले सरांच्या वाढदिवसा निमित्य आपण उद्यापासून चित्रकलेचा क्लास सुरु करूया आणि आज खरेच क्लासची सुरुवात झाली. त्याची काही क्षणचित्रे खाली देत आहे. त्याबरोबर नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक, गीतकार, कवी श्री राजेंद्र सपकाळ सरांनीही त्याच कवितेचे गायन केले. आदरणिय संगीतकार, कवी श्री. अमोल कुळकर्णी सरांनीही त्यासाठी वेळ दिला हि माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. श्री. सपकाळ सर आणि श्री. कुळकर्णी सरांनी भेट म्हणून दिलेले रोपटे माझ्या अंगणाची शोभा वाढवणारे आणि वृक्षारोपण किती आवश्यक आहे सांगणारे आहे. त्याचप्रमाणे माझ्या हातून चांगल्या गझलांचे लेखन व्हावे या हेतुने श्री. साईनाथ फुसे सरांनी अतिशय सुंदर पेन भेट दिला.
त्याचप्रमाणे सिल्लोड आगाराचे आदर्श वाहक, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त श्री. बद्रीनाथ भालगडे दादांनी माझ्या नावाच्या आद्याक्षराने लिहलेल्या कवितेच्या सुंदर फ्रेमची स्नेहपुर्ण भेट माझ्यासाठी अनमोल ठेवा असणार आहे. श्री. भालगडे दादांनी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन कविता माझ्यासाठी लिहल्या व त्याच्या फ्रेम मला भेट दिल्या. दादांच्या प्रतिभेला माझा मनापासून 'सॅल्युट' आहे.
प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचे धनी व सुंदर सुत्रसंचालक असलेले कवी श्री. पवन ठाकुर सरांनी माझ्या वाढदिवसानिमित्य झुम अॅपवर काव्यसंमेलनाचे केलेले आयोजन हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. त्यामधे जेष्ठ साहित्यिक श्री. दीपक सोनोने सर व आमचे मार्गदर्शक, केंद्रप्रमुख कवी श्री. सज्जन टाकसाळे सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून सुंदर काव्यगायन केले ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती. त्यात माझी भाची कु. साक्षी देबाजेलासुध्दा(मेहकर) पहिल्यांदाच कविता सादर करण्याची संधी मिळाली व तिनेही अतिशय सुंदर हिंदी कवितेचे सादरीकरण केले. श्री. सपकाळ सर, श्री. भालगडे दादा यांनीही आपल्या सुंदर रचना सादर केल्या. श्री. दिवटे सरांची उपस्थितीही सुखद होती.
आमचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री. फाळके साहेब यांनी आवर्जुन फोन करून शुभेच्छा दिल्या ज्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.
त्याचप्रमाणे सिध्देश्वर शिक्षक सोसायटीमधेही केंद्रप्रमुख श्री. सज्जन टाकसाळे सर श्री. संजय बिऱ्हारे सर, आदर्श शिक्षक श्री. विशाल टिप्रमवार सर व अनिल पोघे सर, चित्रकार डॉ. गजेंद्र आवारे सर, श्री. रितेश कलकोटे सर, श्री. दीपक सोनोने सर, श्री. राजेंद्र सपकाळ सर, श्री. साईनाथ फुसे सर, श्री. श्रीकृष्ण बडक सर तसेच भोकरदनवरून मुद्दाम आलेले श्री. सुरज महल्ले सर या सर्वांनी शिक्षक सोसायटीमधे माझा वाढदिवस साजरा केला जो माझ्यासाठी अविस्मरणिय क्षण आहे.
वाढदिवसाच्या दिवशी सिल्लोडमधे हजर नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी मला शुभेच्छारुपी आशिर्वाद देण्याकरीता आलेले 'कोहिनुर ऑफ मराठवाडा' पुरस्कार प्राप्त आदरणीय प्रकाशदादा हिवराळे व सेवानिवृत्त ए. पी. आय. श्री. प्रकाशदादा खरात यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून दिलेल्या शुभेच्छा जगण्यास बळ देणाऱ्या ठरल्या.
त्याचप्रमाणे आमचे आदरणिय केंद्रप्रमूख श्री. नरवडे दादा, सिल्लोड शहर पो. स्टे. च्या ए. पी. आय. आदरणीय नालंदाताई लांडगे , श्री. शशिकांत सावंत सर आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, मार्गदर्शक, गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री. दिलीप सिरसाठ साहेब यांनी व्हाट्सअॅपद्वारे दिलेल्या शुभेच्छा मनाला उभारी देणाऱ्या ठरल्या....
अनेकांनी मॅसेजद्वारे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, फोन करून शुभेच्छांचा जो वर्षाव केला त्यामुळे जबाबदारीची जाणिवही प्रकर्षाने झाली.
आपणा सर्वांचे आभार न मानता ऋणात राहणेच बरे !!!!
वाढदिवसाची काही क्षणचित्रे....