शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

 आज आमच्या मिथुनचा वाढदिवस...

आमचा मिथुन म्हणजे माझा मित्र भारत..
सिनेमाची गाणे रेड़ीओवर ऐकायला मिळायची आणि हिरोंची नावे कळायला लागली तेव्हापासून 'आबिताब' आणि मिथुन या दोन हिरोंचा पगडा मनावर होता पण त्या काळात डिस्को डान्स करणारा हिरो म्हणून मिथुनदाच जवळचा वाटायचा.
त्याची स्टाईल, डान्स, डायलॉगची नक्कल करावीशी वाटायची. त्यामुळे आमच्या गँगमधे बरेचजण मिथुन होते. पण सर्वात मोठा फॅन आणि जवळजवळ मिथुनच होता भारत...
मिथुनचा एखादा पिक्चर (व्हिडीओवर १ रु. तिकिट) पाहून आला की तो पुर्णपणे मिथुनमय होऊन जायचा. त्यामुळेच तो कुठलाही डान्सक्लास न लावताही (त्यावेळेला डान्सक्लास होते की नाही हे सुध्दा माहीत नाही.) मिथुनच्या डान्सस्टाईलची हुबेहूब नक्कल करायचा आणि तो आमचा डान्सर मिथून झाला. त्याकाळी फुंकर मारली तर उडून जाईल असा असणारा बेचाळीस किलोचा भारत आज एका बुक्कीत कोणालाही खाली लोळवेल असा ब्यान्नव किलोचा झालेला आहे पण डान्समधे अजुनही काहीही फरक पडलेला नाही. चार मुलींचा बाप असलेल्या या मिथुनमधली डान्ससाठी असणारी लवचिकता आणि अॅक्टिंगचा किडा तसूभरही कमी झालेला नाही.
डान्सच्या आवडीपायी नंतर तो गोविंदाची स्टाईलही हुबेहूब करायचा. त्याकाळी तो सुंदर नाचायचा की, वरातीत त्याचा डान्स पाहून लोकही खूश होऊन जायची. त्याला जोड असायची विष्णुची.(हा आमचा गोविंदा).नंतर मात्र शाहरुखची इंट्री झाली आणि आमचा मिथुन अचानक शाहरूख झाला. हेअरस्टाईलही बदलली. दहावी बारावीचे ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो शाहरुखच्या हेअरस्टाईलमधे काढल्यावर एका साईडने आपण शहारूखसारखेच दिसतो याचा साक्षात्कारही त्याला झाला. नंतर तो शाहरुखचा ऐवढा चाहता झाला की, दिवाना या सिनेमातले गाणे, 'कोई ना कोई चाहिए .... प्यार करनेवाला...... हे गाणे केवळ आपल्यासाठीच बनवण्यात आले आहे असा त्याचा पक्का समज झाला आणि बाजीगर पाहिल्यावर 'आत्ताच्या परिस्थितीत शाहरुखसारखा अॅक्टरच नाही कुणी ' असे तो बिनधास्त बोलायला लागला. नंतर शाहरूखमय झालेला भारत 'डर' पाहिल्यावर चाकुने आपल्या छातीवर एखादया मुलीचे नाव कोरतो की काय अशी भिती आम्हाला वाटायला लागली होती. हे आमच्या भागातील मुलीनांही माहित असल्यामुळे त्याच्या छातीवरील रक्त वाया जाऊ नये म्हणून पुरेपूर दक्षता मुलींनी घेतल्यामुळे त्याला असे काही करायला मिळाले नाही.
वर्णाने काळा असलेला हा मित्र विचाराने खूपच सकारात्मक, विनोदी आणि कोणत्याही परिस्थितीत खूश राहणारा आहे. घराच्या मातीच्या भिंतीत लावलेल्या आरशाच्या फुटक्या काचेत बघत आणि केस शाहरुखसारखे लावत, ' भारत्या... क्या दिखता है बॉस तू' असं स्वतःच स्वतःला म्हणत खूश होणारा माझा हा मित्र कमालीचा स्वाभिमानी आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात मी त्याला कधीही कुणाला पैसे उसने मागतांना पाहिले नाही. आहे त्या परिस्थितीत खूश कसे रहायचे हे त्याला पक्के ठाऊक आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत त्याचे कुणाशी भांडण झालेलेही मला आठवत नाही.
सामाजिक, धार्मिक कार्यात आमच्या गँगचा पूर्णपणे पुढाकार असायचा त्यावेळी कोणतेही काम करतांना त्याने कधी 'नाही' म्हटलेले आठवतं नाही. (पण 'हो' म्हणून ५०% काम केलेलेही मला आठवत नाहीत.)
होळीनंतर धुळवडीच्या आदल्या रात्री मी 'होळी है बुरा मत मानो' म्हणून सर्व मित्रपरिवाराच्या टिंगलटवाळी करण्यासाठी काहीतरी लिहून कागद बौद्धविहाराजवळ चिकटवून ठेवायचो. कुणाच्या रंगाबद्दल काही बोलू-लिहू नये पण भारत रागावला तरी चालेल पण त्याची टिंगल उडवायचीच या हेतुने मी लिहलं होतं, "मित्रा तुझ्या रंगाच भलतच वाटतं वाईट, तुझे कलर फोटोही निघतात ब्लॅक अँन्ड व्हाईट" ते वाचून सर्व गँग हसायला लागली. ते पाहूनच मला, भारतचे आणि माझे भांडण कसे रंगणार ते लक्षात आले. पण झाले उलटेच. स्वतः भारतच एवढा हसला की, माझा ताण कमी झाला. विनोदाची जाण असलेल्या या मित्राने मलाच दाद दिली.
मी लिहिलेल्या एकांकी नाटकात फार सुंदर काम त्याने केले. गावातील लोकांच्या अजुनही ते आठवणीत आहे. दुसऱ्या एका नाटकात अंगात येणाऱ्या बाईचे सोंग त्याने एवढे बेमालुम वठविले होते कि, माहिलांसोबत असणारी लहान मुले घाबरून रडायला लागली होती....
मित्रा तुझ्याबाबतीत खूप आठवणी आहेत त्या कधीतरी सांगेनच...
टिकटॉकवर डान्स आणि अॅक्टिंगचे व्हिडीयो पाहून कुणाच्याही लक्षात येईलच आमचा मिथुनचा शाहरुख झालेला भारत कसा असेल!
तुर्तास एवढेच.....
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा मित्रा...
- आर. के. आठवले
9011895917

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा