शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

 तेथे कर माझे जुळती ......

काल दि. 14/02/2020 ला सावखेडा बु. ता. सिल्लोड येथे झालेल्या ४ थ्या भूमिजन साहित्य संमेलनात शम्स जालनवी साहेब या 97 वर्षाच्या गझलकारांना जवळून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला. त्यांनी 'मेरा मुल्क कितना पागल है' या गझलेचे गायन केले. ते ऐकून माझ्यासारखेच सर्वजण तृप्त झाले असतील. गझल इतक्या तन्मयतेने आणि गोड गळ्याने गायली की, जे त्यांना पहिल्यांदाच ऐकत होते ते सर्वच अवाक् झाले. आवाजात कुठे कंप नाही की, एखादया ओळीचे विस्मरण नाही. चूक नाही की कुठे, अडखळले नाही!
त्यानंतर सुनिलदादा उबाळे यांनी माझी आणि साईनाथ फुसे सरांची त्यांच्याशी ओळख करून दिली. शम्स साहेबांबद्दल ऐकून होतो. सिल्लोड मधील युवा आणि उमदे कवी पवनराजे आणि नव्या पिढीचे गझलकार परवेज (जयविरू)या जोडगोळीकडून मी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्षात भेटलो.
शम्स साहेबांबद्दल काय बोलावं!
तरूणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व...
या वयातही पुर्णवेळ संमेलनात बसून होते. बरं बडेजावं, मोठेपणं किंवा स्टेट्सला जपणं वगैरे त्यांच्या खीजगिणतीतही नाही.
संमेलनात त्यांच्याबाबतीत अनेक किस्से ऐकायला मिळाले. मागे मा. पंतप्रधानांनी दिल्लीला लाल किल्ल्यात मुशायऱ्याचे आयोजन केले होते, शम्स साहेबांना त्याचे निमंत्रण होते. ऐवढा मोठा माणूस पण एका खेड्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात अतिशय सामान्यपणे वावरत होता. काही वेळेला त्यांना आधार द्यायला डॉ. राज रणधीर होतेच.
संमेलनाची सांगता झाल्यानंतर मुद्दामच त्यांना सिल्लोडला चहा घेण्यासाठी आग्रह करून थांबवले होते.
डॉ. गोवर्धन मुळक सर, डॉ. राज रणधीर, प्रकाशदादा खरात, धनंजय गव्हाले सर, श्री. शेजूळ सर, श्री. खेडकर सर, श्री. कायटे सर आणखी काही कवीवर्यांनी चहा घेतल्यानंतर मी मुद्दामच त्यांचा हात धरून त्यांना डॉ. राज रणधीर सरांच्या गाडीत बसवले आणि विचारले , "आता काय, आराम वगैरे चालू असेल ना?" इतरांच्या चर्चेतून ते काय करतात हे मला माहित झाले होते पण गाडीमधे कायटे सरांनी सांगीतले की, ते आता फक्त पेपरच्या दुकानवर बसतात त्यामुळे मी मुद्दामच हा प्रश्न केला. त्यावर, "अरे नही यार, आराम कैसे करेंगे? जबतक होता है तब तक काम करेंगे." त्यावर माझा प्रश्न, आप क्या काम करते है इस उम्र मे?" त्यावर साहेब स्मितहास्य करत म्हणाले,"अरे भाई, मै आज भी सुबह सयकल पर पेपर बाँटता हू!!!!!"
झालात ना आवाक!
साहेब आताही वयाच्या 97 व्या वर्षी सायकलवर पेपर वाटतात.
अशा व्यक्ती पाहिल्या की, जीवनात एक नवी उमेद निर्माण होते. जीवनाकडे सकारात्मकरीत्या पाहण्याचा कल वाढतो.
या संमेलनात साहित्यातल्या अनेक दिग्गज व्यक्त्तिंना जवळून पाहता आणि अनुभवता आले.
खरे तर यासाठी या साहित्य संमेलाचे कार्यवाहक व जि. प. प्रा. शा. सावखेडा बु. चे मुख्याध्यापक श्री. सुनिल डोके सरांना व त्यांच्या शिक्षक सहकात्यांना शतशः धन्यवाद द्यायला पाहिजेत. अतिशय सुंदर असे नियोजन सरांनी केलेले होते त्याचबरोबर सावखेडा बु. चे श्री.काशीनाथ गोरे पाटील(साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष) व सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केले ते कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे होते.
खरचं हे साहित्यसंमेलन एक समृद्ध असा अनुभव देऊन गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा