शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

 "रंगभूमीवरील हुकमी एक्का - राजेंद्र सपकाळ"

सिल्लोड तालुक्यातील नाट्यचळवळीविषयी किंवा रंगभुमीविषयी लिहायचे ठरविल्यास घाटनांद्रा, म्हसला येथिल पारंपारिक चालत आलेल्या हौशी नाट्यचळवळीचा जसा उल्लेख येतो तसा एक नाट्यकलाकार, लेखक म्हणुन त्याचप्रमाणे सिल्लोड तालुक्यातील नाट्यचळवळ जिवंत ठेवणारे, त्याची जपणुक करणारे, त्या कलेशी प्रामाणिक राहुन नाट्यक्षेत्रात काम करणा-या सिल्लोड तालुक्यातील किंबहुना मराठवाड्यातील नाट्यचळवळीविषयी लिहायचे झाल्यास एका नावाचा उल्लेख टाळता येत नाही. ते म्हणजे राजेंद्र विठ्ठल सपकाळ. पेशाने शिक्षक असलेले, विद्यार्थीप्रिय असलेले हे व्यक्तिमत्व केवळ अभिनेता किंवा नाट्यकलाकारच म्हणुन नव्हे तर लेखक, कवी. गीतकार, गायक, दिग्दर्शक. आदर्श शिक्षक व सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व सिल्लोडमधे ‘सपकाळ सर‘ व जवळच्या व्यक्तिंमधे ‘राजू‘ म्हणुन प्रसिध्द आहे.
साधारणपणे उंच व शिडशिडीत बांधा, गहुवर्णिय रंगाचे, हसमुख चेह-याचे काहीसे मिश्किल स्वभावाचे वाटणारे, कुठलाही बडेजाव न बाळगता अत्यंत साधेपणाने राहणारे हे व्यक्तिमत्व पाहिले की, सर्वप्रथम आपली फसगत होते ते त्यांच्या वयावरून. पन्नाशीकडे वाटचाल करणारे सपकाळ सर प्रथमदर्शनी तीस-बत्तीस वर्षाचे वाटतात आणि त्यामुळेच रंगभुमीवरील नाटकातच नव्हे तर शॉर्ट फिल्म असो किंवा वेबसिरिजमध्ये अजुनही नायकाची भुमिका पार पाडतांना दिसतात. त्यांच्या या तरूण दिसण्याचे रहस्य कदाचित त्यांच्या आवडत्या क्रिकेट या खेळात असावे. कारण गेली तीस वर्षापासुन त्यांनी आपली ही आवड जोपासली आहे. सकाळी सात वाजता उठुन क्रिकेट खेळणे हा सरांचा आवडता उपक्रम आहे.
वयाच्या चौदाव्या वर्षापासुन म्हणजे साधारणपणे इयत्ता आठवीपासून रंगभुमीशी सरांची नाळ जोडल्या गेली. कोणतेही मार्गदर्शन नसतांना शाळेत नकला करून दाखवणे, गायन करणे, शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग घेणे अशी धडपड सुरू असतांन आतला कलाकाराला जेव्हा पाहिजे तसा वाव मिळत नव्हता त्यामुळे 1994-95 मधे सरांनी शाळकरी मित्र डॉ. राजू दौड, मधुकर मिरगे, रतिलाल कुमावत रूपेश ठाकूर व मुनीराज भालेराव यांच्या सहाकार्याने बालगणेशमेळा स्थापन केला. बालगणेशमेळा स्थापन केल्यानंतर त्यांना त्यांचे शिक्षक श्री. प्रमोद सुरडकर यांचे मार्गदर्शन लाभलें. बालगणेशमेळा चालवतांना येणा-या अडचणी, त्या काळातल्या गमती-जमती, आलेले अनुभव हा एक स्वतंत्र विषय आहे. पण बालगणेशमेळाव्यापासुन झालेली सरांची सुरूवात नाट्यलेखन, दिग्दर्शन, शॉर्ट फिल्म, वेबसिरिज ते चित्रपट निर्मितीच्या स्वप्नापर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.
2009 मधे मी सिल्लोड तालुक्यात शिक्षणसेवक म्हणुन रूजु झालो आणि 2010 मध्ये एका प्रशिक्षणामधे ते प्रशिक्षक म्हणुन आम्हाला ट्रेनिंग देत असतांना सरांविषयी मला माहिती मिळाली व मी सरांना भेटून नाटकात काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यावेळी मी देऊळगाव बाजार या शाळेत रूजु होतो व तिथेच राहत होतो आणि सर भवन येथे रहायचे व तिथेच नाटकाची तालिम व्हायची त्यामुळे तीस किलोमीटर अंतर पार करून नाटकाच्या तालमीला येणे शक्य नव्हते म्हणुन सरांनी मला, तुम्ही सिल्लोडला रहायला आल्यावर भेटा मग बघु असे सांगीतले. त्यामुळे शिक्षणसेवक काळ संपेपर्यंत व सिल्लोडला रहायला येणेपर्यंत मला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण 2012 च्या मार्च मध्ये माझा शिक्षणसेवक काळ संपल्याबरोबर मी मे महिन्यात सिल्लोडला रहायला आलो आणि सर्वप्रथम सरांना फोन करून मी सिल्लोडला रहायला आल्याचे सांगीतले व मला नाटकात काम करायला मिळेल काय म्हणुन विचारले आणि सरांनी होकार दिला. त्याच वर्षापासून मी सरांच्या विघ्नहर्ता आर्टस़् या नाट्यसंस्थेशी जोडला गेलो. आतापर्यंत मी सरांच्या चार नाटकात, दोन वेबसिरीज मध्ये व एका शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे त्यामुळे सरांना जवळून अनुभवता आले. एक कलाकार, लेखक, कवी म्हणुन ते जेवढे प्रगल्भ आहेत तेवढेच माणूस म्हणुनही प्रगल्भ व सामाजिक भान जपणारे हाडामासाचे शिक्षक आहेत.
आजपर्यंत सरांनी, तिन तिघाडा काम बिघाडा, जावई पाहिजे घरजावई, खरं काय खोटं काय?, त्यात काय लाजायचं!, आणि नवरा माझी बायको अशी पाच नाटके लिहिली व त्याचे शंभराच्यावर यशस्वी प्रयोग केले. शायिस्ताखानाची बोटे कुणी तोडली?, कुणाचे गाणे कुणाच्या ओठावर या एकपात्री नाटकाचे लेखन व सादरीकरण केलेले आहे. गुद्मरलेलं आभाळ हा चारोळी संग्रह, सामाजिक व शैक्षणिक गीतसंग्रह, अनेक शालेय एकांकीचे लेखन, चार नाट्यशिर्षक गीतांचे लेखन, गाथा काळू स्वामींच्या भक्तीगीतांच्या दोन सिडीज् प्रकाशित केल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या ‘त्यात काय लाजयचे‘ या नाटकातील सहकलाकार व-हाडी कवी संगीतकार श्री. अमोल कुळकर्णी सर यांच्या संगीत दिग्दर्शनात दोन कोरोना जनजागृती गीत तयार केले. त्याचप्रमाणे ‘जि. प. शाळा, प्रगत शाळा‘ या शैक्षणिक माहिती पटाची निर्मिती व व दिग्दर्शन, वर्तुळ या शॉर्ट फिल्मची निर्मिती व दिग्दर्शन, बोल ब्रम्हचारी, कल्पना यामधे अभिनय त्याचप्रमाणे बलुतेदार, फालतुगीरी, खरं काय, खोटं काय, कॉलेज मस्ती या वेबसिरीज केल्या आहेत. पण त्यांचा जास्त कल हा नाटकाकडे आहे.
नाट्यलेखन, तालीम व त्याचे प्रयोग करेपर्यंत सरांची असणारी तळमळ मी जवळून अनुभवलेली आहे आणि अनुभवतो आहे. सरांचे नाट्यलेखन हे कायम विनोदी ढंगाचे असले तरी शेवटी सामाजिक संदेश दिलेला असतो. एकदा मी त्यांना म्हणालो, ‘केवळ विनोदीच नाटक का लिहता सर, आपण दरवर्षी महाराष्ट्र हौशी नाट्यस्पर्धेत नाटक सादर करतो आणि तिथे विनादी नाटकाला काहीच महत्व देत नाहीत.‘ त्यावर सरांनी दिलेले उत्तर फार महत्वाचे होते. ते म्हणाले, ‘सर सामान्य माणुस जीवनात आधीच फार दुःखी आहे, अडचणींनी त्रस्त आहे त्यामुळे त्यांना जर दोन क्षण हसविले, विरंगुळा दिला, करमणुक केली तर तेवढाच त्यांच्या जीवनात आनदं पेरल्याचे समाधान लाभते आणि स्पर्धेत मिळणा-या पुरस्काराचे म्हणाल तर हे सर्वसामान्य प्रेक्षक दरवर्षी आपल्या नाटकाची वाट पाहतात, हजारोंच्या संख्येने नाटकाला गर्दी करतात, आपल्यावर प्रेम करतात हा फार मोठा पुरस्कार आहे.‘ मलाही ते पटले. कारण सरांचे:पाणदान आणि ‘गर्भाशय भाड्याने देणे आहे‘ हे दोन गंभीर आणि समाजाच्या डोळ्यावरील झापड काढणारे नाटके तयार आहेत. पण अशी नाटके बाहेर गणेशोत्सव आणि दुर्गाउत्सवात चालत नाहीत आणि नाट्यागृहात रंगभुमीवर सादर करायची म्हटले तर निर्माता भेटत नाही.
सरांचा स्वभाव मुळातच शांत व संयमी असल्यामुळे कलाकरांचा सराव घेतांना, नाटकाची तालीम सुरू असतांना मी त्यांना चिडचिड करतांना, कलाकारांवर ओरडतांना आजपर्यंत पाहिले नाही. सरांच्या नाटकाचा ढाचा जसा ठरलेला आहे त्याप्रमाणे दिग्दर्शनाची पध्दतसुध्दा ठरलेली आहे. नाटक उभे करतांना सर प्रत्येकाला एक संहिता देतात, ती वाचायला सांगतात आणि तुम्हाला ते पात्र कसे समजले तसे उभे करण्याची मुभा देतात म्हणजे आपल्याला आपल्या पध्दतीने ते सादर करू देतात. पण जेव्हा त्यांना अपेक्षित असलेला अभिनय दिसत नाही तेव्हा मात्र ते सुचना करतात किंवा ते पात्र कसे आहे, प्रसंगाची मागणी काय आहे किंवा त्या पात्राची मानसिकता काय असेल ते समजावून सांगतात ऐवढे करूनही लक्षात आले नाही तर स्वतः अभिनय करून दाखवतात. सरांच्या संहिता वाचन करतांना अनेकदा हे लक्षात येत नाही की, काही ठिकाणी विनोद निर्मिती होऊ शकते. मात्र सर कोणत्या ठिकाणी काय, कुठे आणि कशी जागा काढतील याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे अगदी सामान्य वाटणा-या वाक्यातुन किंवा प्रसंगातुन सराव करतांना विनोद निर्मिती होते. नाटकाची तालीम करतांनाचे अनुभव एवढे वेगळे आणि गमतीदार असतात की, सादरीकरणापेक्षाही जास्त विनोद तिथे होत असतात. ते अनुभवही लिहण्यासारखे आहेत. काही वेळेस तर नाटक सादर करतांनाही विनोद घडतात कारण सरांना चालु नाटकात एखाद्या प्रसंगात काहीतरी वेगळेच सुचते जे सराव करतांना सहकलाकाराला माहीत नसते त्यामुळे त्यालाही हसु आवरत नाही त्यामुळे कलाकार स्वतः आवर घालु शकत नाही. त्यामुळे आमचे सहकलाकार, निर्माते श्री. गीते सरांची तर अनेक वेळा तारांबळ झालेली आहे. मलाही कित्येक वेळा तो अनुभव आलेला आहे. पण मी कंट्रोल करू शकलो किंवा प्रेक्षकांना कळू दिले नाही. प्रत्येक सहकलाकाराला हा अनुभव आलेला आहे. सर हे मुद्दाम करत नाही तर ती वेळेवर सुचलेली अॅडीशन असते. मामा म्हणजे अशोक सराफ यांना सर गुरू मानतात नव्हे ते त्यांचे भक्तच आहेत. पण म्हणुन ते अशोकमामांची कॉपी करत नाहीत. सरांच्या अभिनयाची एक वेगळी शैली आहे. आवाजातील चढ-उतार, लवचिकता, वैविध्यता हा सरांचा एक प्लस पाॅंईंट आहे. एकच शब्द किंवा वाक्य ते वेगवेगळ्या शैलीत किंवा विविधतेने सादर करतात ते पाहण्यासारखे व ऐकण्यासारखे असते. त्यामुळे मी अनेकजणांना ‘तुमचा अभिनय पाहून अशोक सराफ यांची आठवण झाली किंवा तुम्ही अशोक मामांसारखेच हसवता‘ असा अभिप्राय देतांना ऐकले आहे. अकोल्याला ‘त्यात काय लाजायच‘ चा प्रयोग झाल्यानंतर माझा दोन तिन मित्रांनी हाच अभिप्राय दिला होता. सरांचे वय आहे त्यापेक्षा कमी दिसते आणि मेकअप केल्यानंतर आणखीच कमी होतं त्यामुळे अकोल्याचा प्रयोग झाल्यानंतर माझा भारत नावाच मित्र मला म्हणाला, ‘अरे काय नाटक हाय बॉ तुमचं हसुनहसून मेला लेका मानुस, आनं ते लंब-लंब लुकडसं पोट्ट कोन होतबे ते? निरा अशोक सराफच हाय बॉ ते!..... कन्नड तालुक्यातील नाचनवेल या गावचा प्रसंग तर त्याहुन बोलका आहे. त्या गावात आमचा सहकलाकार पंकज सावंतचे नातेवाईक होते. 2018 साली नाटकाचा प्रयोग झाल्यावर पंकजला त्यांनी विचारले, अरे हा पतलासा पोरगा कोण आहे? आपल्या मुलीसाठी बघ विचारून.‘ त्यावेळेस सरांचीं मुलगी सातवीत होती.
आजपर्यंत सरांच्या जावई पाहिजे घर जावई या नाटकास ग्रामिण राज्यनाट्यस्पर्धेत आठ वेळा, खर काय.... ला पाच वेळा, त्यात काय लाजायचला तीन वेळा व तीन तिघाडाला... एक वेळा सांघीक प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्याना स्वतःला तेरा वेळा उत्कृष्ट अभिनेता, आठ वेळा उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन व सामाजिक कार्यासाठी चार वेळा पुरस्कार मिळाले आहेत. शासनाच्या 55 व 58 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी प्रमाणपत्र तर ‘नवरा माझी बायको‘ या नाटकाला एक वेळ प्रथम क्रमांक व वैयक्तिक पारितोषीक मिळाले आहे. मा. पुरूषोत्तम भापकर यांच्या हस्ते शैक्षणिक डॉक्युमेंटरीसाठी पुरस्कार, विविध सामाजिक संस्थाकडून सहा पुरस्कार मिळाले आहेत.
सरांनी काव्यलेखनात ‘बारोळी‘ या एका नविन काव्य प्रकाराची भर घातली असुन बारा ओळीच्या या काव्यप्रकारात समाजातील अनिष्ट रूढीं, असमानता, अन्याय यावर प्रहार केलेला असतो. साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना मसापचे सचिव पद, अजिंठा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले असून धोतरा व लिहाखेडी ता. सिल्लोड येथे त्यांनी निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. तर अनेक कविसंमेलनामधे प्रमुख उपस्थिती म्हणुन स्थान भुषविले आहे.
कोरोना काळात दातृत्व ग्रुपच्या निर्मितीत पुढाकार घेवुन 160 कुटूंबांना प्रत्यकी 450 रूपये किंमतीच्या कीट कुटुबांना पोहचविण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. स्मशानभुमित व इतर अनेक ठिकाणी सरांनी वृक्षारोपन करून वाढदिवस रोपटे भेट देऊन साजरा करण्याचा पायंडाच सरांनी पाडला आहे. कोरोना काळात विद्याथ्र्यांच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरांनी घेतलेल्या उपक्रमाची दखल सकाळसारख्या अनेक वृत्तपत्रांनी तर घेतलीच त्याचबरोबर शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिका-यांनीसुध्दा घेवुन त्या बातम्यांचे कात्रण सामाजिक माध्यमांव्दारे तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांपर्यत पोहचविले.
त्यांच्या प्रत्येक कार्याची, नाट्यकलेची, शालेय उपक्रमाची महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, दिव्य मराठी सारख्या वर्तमानपत्रांनी विशेष दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे नाट्यपरिक्षकांनीसुध्दा विशेष दखल घेतली आहे. महाराष्ट्र हौशी नाट्य स्पर्धेत त्यात काय लाजायचं या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग झाल्यानंतर परिक्षकांनी आम्हाला कॉन्फरन्सरूममधे बोलावल्यानंतरचा अनुभव काही वेगळाच होता. नाटक वेळेत पुर्ण न झाल्याने बाद झाले होते पण परिक्षकांनी जेव्हा सांगीतले की, ‘अतिशय सुंदर नाटक आहे. या नाटकाचे तुम्ही व्यावसायिक प्रयोग करा. विशेष म्हणजे आम्ही आज परिक्षक म्हणुन नव्हे तर प्रेक्षक म्हणुन नाटक एंजॉय केले. खुप विनोदी नाटक आहे. टिम चांगली आहे. याचे व्यावसायिक प्रयोग करा.‘ ही परिक्षकांची प्रतिक्रिया सरांच्या लेखनाला दिग्दर्शनाला व पुर्ण टिमला मिळालेले मोठे बक्षिस होते. विशेष बाब म्हणजे सरांनी अभिनय, दिग्दर्शन व लेखनाचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे औरंगाबादमधे प्रयोग झाल्यानंतर जेव्हा विद्यापिठातील नाट्यविभागाचे आजि-माजी विद्यार्थी सरांना भेटतात व नाटकाबद्दल, अभिनयाबद्दल व लेखनाबद्दल दाद देतात तेव्हा आश्चर्य वाटते. अनेकजण सरांसोबत काम करण्याची ईच्छा व्यक्त करतात. इतकेच नाही तर अनेकांनी व्यावसायिक प्रयोगाकरिता नाटकाच्या संहितासुध्दा मागीतल्या आहेत. सरांबरोबर काम केलेले प्रशांत गीते, ऋषिकेश वांबुरकर, रूपेश परतवाघ, रोशनी भोकरे, राहूल घोडके असे गुणी कलावंत विविध मालिकांमधे व चित्रपटात काम करीत आहेत.
गेली 25 वर्षापासून हौशी कलाकार म्हणुन रंगभुमीवर वावरत असतांना केवळ आर्थिक विवंचनेपायी सरांना व्यावसायिक रंगभुमीवर उतरता आले नाही. नाट्यक्षेत्रातील प्रस्थापित व छुप्या लॉबीचाही त्रास सरांना सहन करावा लागला. प्रयत्न करूनही निर्माता मिळायला तयार नाही. चित्रपट निर्मितीसाठी मात्र काही निर्माते सरांच्या मागे लागले आहेत. पण नाटकासाठी कुणी तयार होत नाही. आपल्या नाट्यप्रयोगाने पाच-सहा हजार प्रेक्षकानां तीन तास खिळवून ठेवणारे सर आर्थिक विवंचनेपायी व्यावसायिक रंगभुमीपासून अजुनही दूर आहेत ही एक खंतच आहे.
पण सर, येणा-या काळात आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक घडणार हे नक्की!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आर. के. आठवले
आनंद पार्क, सिल्लोड औरंगाबाद
9011895917

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा