एक कडी निखळली..
मनोज
वय ४३...
तू गेलास. ७ तारखेला...
आकड्यांचा खेळ निराळा आहे हे तुझ्या वयाकडे आणी जाण्याच्या तारखेकडे पाहिले की लक्षात येते.
सात ने घात केला.
कावीळ हे आमच्यातून निघून जाण्यचे कारण कसं काय होऊ शकतं? तू गेलास हे मन मानायला तयार नाही. विश्वास बसायला तयार नाही. सर्व गाव हळहळतांना काल मी पाहिलं.
अरे, परवा सायंकाळी पाच वाजता तू बुध्द विहारासमोर बसून गौतमला चिडवत त्याची मजा घेत, हसत- हसवत बसला होतास ना? आणि काल सकाळी सगळ्यांना रडवत निघून गेलास?
लॉकडाऊननंतर कित्येक दिवसांनी तुला ट्रकवर काम मिळाले आणि तू कलकत्त्याला ट्रिप घेवून गेलास. तेव्हाच तुला ताप भरला. परिस्थितीने हतबल झालेला तू साधा ताप म्हणून ग़ाडी चालवत राहिलास आणि काविळाने तुला गाठले. तशा परिस्थितीतही थंडी वाऱ्यात गाडी घेऊन परत आल्यावर निदान झाले पण उशिर झाला. तब्येतीपेक्षाही तुला काम महत्त्वाचे वाटले. शेवटी घात झाला.
मित्रा, मी तर अमोल गोंडचवर सरांच्या, रविवारच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी हजर रहावं म्हणून शनिवारी रात्री पोहचलो होतो. पण तुझ्या अंतिम सोहळ्यात सामिल व्हावं लागलं. कसलं हे दुर्दैव?
एखादी टाळाटाळ माणसाच्या किती जिव्हारी लागते याचा अनुभव मी आज घेतोय. शनिवारी रात्री ८ वाजता अकोल्यात पोहोचलो आणि जेवण करून सुरेंद्रकडे निघायचा विचार होता पण थंडी वाजत होती म्हणून सकाळी तुम्हा सर्वांना भेटू म्हणून घरीच थांबलो. सकाळी झोपेतून उठत नाही तर तु गेल्याचे आईने स्वतःच धक्कातून सावरत मला सांगीतले. डोकंच सुन्न झाले ऐकून! फार मोठा धक्का होता तो. रात्री घराबाहेर पडलो असतो तर तुला भेटता, बोलता आले असते. ऐरवी प्रत्येक वेळी भेटणारा तू यावेळी न भेटता गेलास.
जवळपास १५ वर्षाच्या कालावधीनंतर कोरोनाच्या लाटेमुळे औरंगाबाद सोडून घरी परतायला तुला उणेपुरे ७-८ महिनेही झाले नसतील. या काळात हातचे काम गेल्यामुळे खचलेला तू आपल्या माणसात, मित्रपरिवारात आल्यामुळे खूश दिसायचास पण परिस्थितीपुढे हतबल झालेला दिसलास. कधीही कुठे कामाला न पाठवलेल्या वहिनीला कामाला जावे लागतेय म्हणून मनात असलेली खंत किती हळवेपणाने व्यक्त केली होतीस तू माझ्याजवळ! मनातील दुःख किती विश्वासाने मोकळे करायचास तू माझ्याजवळ!
पण एवढा खचलेला असतांनाही विनोदबुध्दी शाबुत होती तुझी. तशा परिस्थितीतही टिंगल-टवाळी करणे, एकमेकांची मजाक करणे कुठे थांबले होते? खरं तर तो त्या हतबल दिवसात जगण्याचा मंत्रच होता जणू! प्रत्येक जण तुझं गंमतीचे पण प्रेमाचे वागणे कालआठवत होता.
तू सिल्लोडला आलास तेव्हा ट्रक आनंद पार्क जवळ उभा करून जेव्हा पहिल्यांदा घरी आलास तेव्हा अंघोळ न केलेला, मळके कपडे, विस्कटलेले केस अशा अवतारात चेहऱ्यावर नेहमीचे हसू घेवून तू डायरेक्ट सरळ-सरळ बाथरूममधे घुसलास आणि
मास्तर, टॉवेल कुठाय रे?...... म्हणत टॉवेल शोधायला लागलास तेव्हा माझ्या दोन्ही मुली तुझ्याकडे अवाक् होऊन पाहतांना मला हसु येत होतं. तुझं मनमोकळेपणानं वागणं, घरभर वावरणं त्यांच्यासाठी अप्रुपच होतं. बायकोला मित्रांबद्दल सांगत असल्यामुळे तिला काही वाटले नाही पण मुलींसाठी ते नविनच होतं. हात पुसत-पुसत लगेच तु मुलींकडे वळला आणि..
आबे मास्तर, ही लहानी तं धिऱ्याच हाय रे...... धिऱ्या असाच दिसायचा लहानपणी ... आन् ही मोठी नऱ्या...
हाय का नाई? खरं सांग मास्तर....
हो... मी हसत बोललो.
आणि माझ्या दोन्ही लहान भावांचे नावं त्यांना देऊन तू शेवटपर्यंत त्यांना त्याच नावाने बोलत राहिलास. मी अकोल्यात आलो की, मुलींना पाहून, "आले रे बॉ नरू-धिरू म्हणायचास.
घरी आल्यावर मुलींना विचारलस...
"बेटा, मी कोणंय माहित हाय का?"....
बेटा, हे मनोज काका....... मी म्हणालो. तेव्हा तू हसून म्हणालास.
" ऐ..मास्तर, खरं नाव सांगना मव्ह.. सांग, सांग... व्हऊ दे पोरेलेबी माहीत...
तेव्हा मी ठहाका मारून हसून म्हणालो,
"खोबळ्या" .... आम्ही तुला ज्या नावाने चिडवतो ते नाव मी सांगितले. मुली पहातच राहिल्या आणि आतून वहिनी हसल्यावर तू म्हणाला,
"वहिनी, मास्तरच नाव सांगू का आता? ....
"मुका बस ना खोबळ्या रे..." मी म्हणालो. तसा मुलींनी घोषाच लावला.
"सांगा काका, सांगा..." मग आपण दोघेही हसायला लागलो.
हसत-हसत तू किचनमधे जाऊन वहिनीला म्हणालास,
"वहिनी, मास्तर लय करामती हाय बरं, लय करामती करून ठेवेल हायेत मास्तरनं, सांगू का रे मास्तर"....
मी हसून म्हणालो,
"सांग सांग, मी पण येणार आहे दोन-तीन दिवसांनी औरंगाबादला, मग वहिनीला भेटतोच"....
तेव्हा ही हसत म्हणाली,
सांगू द्या ना, काय करामती केल्या ते...
तेव्हा तू हसतच म्हणाला,
"वहिनी, मास्तरच एकटा हाये आमच्या बॅचमधला, ज्यो नोकरीलं लागला, बाकी आम्ही तं गेलो वाया... पण वहिनी मास्तर होता गावात तं, १४ एप्रील आन् दसऱ्यालं लय कार्यक्रम घ्यायचो आम्ही, माहोलच राहायचा दोन-तीन दिवस गावात, आमची बॅच सगळयाच गोष्टीत पुढं होती, एक अभ्यास सोडला तं... असं म्हणून तू हसायला लागला. पुढे म्हणालास,
"पण मास्तर शिकला, सोबत हमाली केली वहिनी आम्ही सुतगिरणीत... आम्ही तं दाव्हीबारावीतच ढुस झालो वहिनी, पण मास्तरच काही मन नवतं निंघलं शाळंतून... पाच-सहा वर्षानं डबल शिकला ह्यो आन् झाला मास्तर".....
वहिनीला किती न् काय सांगू असं झालेलं तुला. ते सगळे मित्रप्रेमापोटी चालले होते.
सुतगिरणित हमाली करतांना, अकोल्याच्या त्या कडक उन्हात बाहेर, आपण पाच-पाच, सहा-सहा कापूसगठाणच्या गाड्या खाली करून थप्पी मारायचो तेव्हा निव्वळ एकमेकांच्या टिंगळ-टवाळ्या करत काम करायचो. त्यामुळे त्या कष्टाच्या कामाचेही काही वाटायचे नाही. सगळ्यात जास्त तुलाच टार्गेट करायचे पोरं. पण तू कधी राग मानला नाही. दिपक, गौतम लहान असुनही किती उडवायचे तुझी! पण तु सुध्दा तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर द्यायचा.
किती गोष्टी आठवायच्या तुझ्या! चौथी-पाचवीत असतांना तू तुझ्या मामाच्या गोष्टी सांगायचा. त्यावरूनही आजपर्यंत आम्ही तुला चिडवत आलो अन् तू सुध्दा हसत राहिलास.
काय तर म्हणे,
मह्या मामाची लय मोठ्ठ घर हाये बंबईत आन् मोठ्ठच्या मोठ्ठ कुत्रंबी हाये. ते हुशार बी लय हाय. एकदा मी बंबईत हारपलो तं मह्या मामानं कुत्र्यालं महा फोटू दाखवला आन् मंग कुत्र सगळ्या बंबईत हिंडल, मले धुंडून काढलं न् मह्या मामाच्या घरी घेऊन गेलं. महा मामा लय शिरिमंत हाये, बंबईत मह्या मामाजवळ एक आगीनगाडीबी हायं...
किती मोठेपणा सांगायचा तू मामाचा? तुझ्या सुप्त मनात आपला मामा खूप श्रीमंत असावा ही जी आशा होती त्याचे ते कल्पनाचित्र होतं.
आजही तू हरवला आहेस, जेथून तुला शोधून आणणे कठीण आहे.
लहानपणी बुध्दविहारासमोर पाहिलेल्या पिक्चरची फायटिंग करायचो आपण कबड्डीच्या मैदानात. किती गोळीबार केला आपण एकमेकांवर! कित्येक वेळा मेलो अन् जिवंत झालो.
पण आज तू........
तुझ्या नेहमीच्या हसमुख स्वभावामुळे अन् गमती करण्याच्या स्वभावामुळे तुला भारत म्हणायचा,
"आरे, खोबळ्या सुधर ना जरासा... जावई आला ना तुले, शरीरानंच वाढला लेका.. दिमाकानं आजुनही तसाच हाये तू .. हेल्याचं मस्तकं. बुध्दी हाये का नाही तुले"...
तेव्हा तु पण तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर द्यायचास भारतला.
"हाव रेे नाग्या, बुध्दी जरा कमीच हाये माही, देनं तुही थोडी"...
तुले देऊन मी काय करू मंग... तुह्या दोन्ही पोरीचे लग्न झाले माह्या बाकी हायेतं ना आजून...
असे बोलून सगळे हसायचे. कसलाही राग नाही की, मनात एकमेकांविषयी अढी नाही.
किती गोष्टी आठवायच्या तुझ्या. माझ्या घरी गेलास की आईला हक्काने "माय, माय" म्हणून बोलणारा तू, लेकरांचे लाड करणारा तू, सगळ्यांसोबत हसत बोलणारा तू.....
सगळा भूतकाळ डोळयासमोरून तरळून जातोय.
मध्यतंरी दोन वर्षे मी वाशिमला राहायला होतो. तेव्हा तू भेटायला आलास. बाहेर आपण गप्पा करत उभे असत ज्या मुलासोबत माझे वाद झाले होते त्याला पाहून मी सहज बोललो.
"आरे हा हिरो जरा जास्तच डेरिंग करते गड्या मह्यापुढ पण... पुढचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच तू पळत सुटलास आणि त्याची कॉलर पकडून दोन-तीन ठेऊनही दिल्या.
"भाऊ हाय आपला, यालं जर तरास झाला तं घरात घुसून मारीन बाबू".... कसेबसे मी आवरलं तुला. आपण नव्या शहरात आहोत, नविन आहोत हे सर्व विसरून तू भिडलास त्याला. त्यानंतर खरचं तिथे मला त्रास झाला नाही. अधुनमधून तुम्ही सर्वच मित्रमंडळी मला भेटायला यायची त्याचाही तो परिणाम असेल कदाचित.
काय-काय आठवायचं मित्रा! आताही अकोल्यात आलो की, रात्री गप्पांच्या ओघात बारा-एक कधी वाजायचा, कळायचं नाही. तू गेलास त्या रात्रीही मी, भारत, अनिल अन् राजू एक वाजेपर्यंत बसलो विहारासमोर. मी तरी जेवून आलो होतो. भारत अन् अनिल दोघेही उपाशिच होते.
स्मशानभुमितही निव्वळ मजाका करणारे आपण, आणि आजपर्यंत कधीही न रडणारा धाडधिप्पाड देहाचा भारत तुला अग्नि दिल्यावर अचानक हमसून-हमसून रडायला लागला तेव्हा तुझे जाणे जिवाला किती चटका लावणारे आहे हे पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले मित्रा...
रात्री साडेबारा, पाऊणला आम्ही पून्हा स्मशानभुमिकडे गेलो तेव्हा काही निखारे धगधगतांना दिसले, पण तू कायमचा निघून गेलास पुन्हा न दिसण्यासाठी. अन् आपल्या मित्रसाखळीतली एक कडी कायमची निखळली....


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा