संवेदनहिनतेचा कळस .............
गोड आहे ना छोकरी .....डोळे बघा . नवलाईने पाहताहेत जगाकडे. डोळयात निव्वळ उत्सुकता सारं काही जाणुन घेण्याची.आणखी निट बघा. काय काय दिसतयं चेह-यावर .........
पण किती कळयांना असं जग पाहण्याचं भाग्य लाभतयं आणि किती कळयांना उमलण्याआधीच खुडल्या जातयं?
सकाळी वर्तमानपञ उघडले की , काय वाचायला मिळेल याचा नेम नाही. मन धास्तावुन टाकणा-या , मन सुन्न करून सोडणा-या बातम्या वाचायला मिळतात. का एव्हढया बोथट झाल्या आहेत जाणिवा? कुठे गळुन पडली आहे संवेदनशिलता. का झाला आहे एवढा निर्दयी समाज. भौतिक सुख आणि मुलाला दिले जाणारे अवास्तव महत्व यात माणसातील माणुसकी का अशी हरवत चालली आहे ?
काल परवाची घटना. एक महिन्याच्या निशाणिला तिच्या आईने चुलीत जाळुन मारले.........किती ही अमानुष घटना ही !!!!!
काय दोष असेल त्या निर्दाेष जीवाचा ?..............
कशी असेल ती आई ? ........... आई ? ........ माता ? ......... कसं म्हणायचं "आई " त्या स्ञीला ?
मुलगी झाली म्हणुन तिच्या स्ञीत्वाचा अपमान झाला होता की काय ? .....की तीला समाज जगुच देणार नव्हता ? ........
कुठे गेले तिच्यातले ममत्व ? का नसतील तिचे हात थरारले आपल्या चिमुकलीचा असा घात करतांना ?
अशा कित्येक कळया आजही गर्भातच खुडल्या जात आहेत. कित्येक कळया चार दोन श्वासापुरत्या जगतात आणि फेकुन दिले जाते त्यांना कचराकुंडीत , नदी - नाल्याच्या काठी, उघडयावर . कित्येक वेळा तर कुञ्यांनी लचके तोडलेत या कोवळया कलेवरांचे. जेव्हा हे सर्व ती माता ऐकत असेल , वाचत असेल तेव्हा तिच्या काळजाला पीळ पडत नसतील का ? मग का वागत असतील त्या अशा ?
काय मजबुरी असेल त्यांची आणि असेल तर ती एव्हढी की स्वत: च्या बाळाला मारून टाकण्या इतपत ?
निशाणिला संपविणा-या त्या आईने पोलीसांना काय जबाब दिला- आम्ही गरीब आहोत , तीला जगवायचं कसं ? समाजातुनही तिला ' दुसरीही ' मुलगी झाली म्हणुन टोमणे ऐकावे लागत होते.
गरिबी हे एका कोवळया जिवाला संपविण्याचा कारण असु शकते ? आणि असेलही तर आपली गरिबी एवढी टोकाची आहे हे तिला आणि तिच्या नव-याला त्या कोवळया जिवाला जन्माला घालण्यापुर्वी कळले नाही का?
समाज टोमणे मारतो म्हणुन ............... एवढा अपमान होतो आपला टोमण्यांमुळे ? आणि मान अपमान या गोष्टी कितपत मानव्यात व अपमानामुळे मन एवढे बोथट व्हावे की संवेदनहीनतेमुळे आपण संपवावे आपल्याच काळजाच्या तुकडयाला.........
कोणाला दोष दयायचा या अमानुष करणीचा. आईला , पित्याला , की समाजाला...........
समाजाचा मुलींविषयी असलेली मानसिकता, समाजाचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टीेकोनच याला कारणीभुत आहे. मुलगी ही परक्याचे धन म्हणुन तिच्या जन्मापासुन तिचे जगण्याचे हक्कच नाकारणारी मानसिकता अज्ञानामुळेच समाजात फोेफावत चालली आहे. याला पुरूषही तेवढेच जबाबदार आहेत. नाहीतर एक स्ञी आपल्या पोटच्या गोळयाला चुलीत जाळण्याइतके टोकाचे पाऊल का उचलेल.
अशा किती कळया अजुन खुडल्या जातील ? किती ??? ....................या कोवळया जिवांचा मुक आक्रोश कुणाच्या काळजाला पीळ पाडणार नाही ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा